सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. पण, कोयना धरणात अजूनही ५१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. ३१ मे पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. तर सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढल्याने कोयनेतून विसर्ग वाढवून तीन हजार क्युसेक करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सुमारे १५० गावे आणि ५०० हून अधिक वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर कमी पर्जन्यमानामुळेच गेल्यावर्षी बहुतांशी धरणे भरली नव्हती. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. पण, या धरणातील पाणीसाठाही ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे यंदा टंचाई निवारणासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी होऊ लागली. त्यानुसार पाणी सोडण्यात येत आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असलातरी कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच आहे.सांगलीसाठी आतापर्यंत धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू ठेवून २१०० आणि आपत्कालीन द्वारमधून ४०० असा २५०० क्युसेक विसर्ग सुरू होता. पण, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी आणखी वाढली. त्यामुळे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ९०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी आता सांगलीसाठी आपत्कालीन द्वार ९०० आणि पायथा वीजगृह २१०० असा तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे सर्व पाणी कोयना नदीतून जात आहे.जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. तरीही कोयना धरणात अजून ५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर गतवर्षी सुमारे ५५ टीएमसी पाणी धरणात होते. सध्या असणारा पाणीसाठा ३१ मे अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे.
कोयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून..कोयना धरणातील पाण्यावर महत्त्वाच्या तीन सिंचन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी आहे. तर ताकारी आणि म्हैसाळ योजना सांगली जिल्ह्यासाठी आहेत. या दोन्हीही योजना मोठ्या आहेत. यासाठीही कोयनेतील पाण्याची तरतूद आहे.