शेतीशिवाय मजा नाय’ या वाक्यानुसार तरुण शेतकऱ्याची आपली माती व शेतीबद्दल असणारा जिव्हाळा. तसेच ज्या क्षेत्रात पाण्याअभावी कसलेच उत्पादन घेता येत नव्हते. अशा ठिकाणी जिद्द व चिकाटीच्या बळावर बेभरवशावर पडणाऱ्या पर्जन्यावर मात करत अर्थशास्त्र विषयाची पदवी प्राप्त करूनही शेतीत भविष्यपूर्ण यशस्वी प्रयोग करण्याची मनापासून ओढ जाधववाडी, ता. कोरेगाव येथील प्रगतशील युवा शेतकऱ्याची दिसून येत आहे.जाधववाडी, ता. कोरेगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर ‘ढग्या’ नावाच्या परिसरात सचिन रामचंद्र जाधव या युवा शेतकऱ्याच्या वडिलांनी ३० गुंठ्याचे क्षेत्र खरेदी केले होते. हा जिल्ह्याच्या पूर्वेकडील परिसर नेहमीच अल्प प्रमाणात पावसाचा असल्याने दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कसलाही पाण्याचा स्त्रोत नसणाऱ्या या ओसाड माळरानावर शेती विकसित करण्याचा धाडसी प्रयोग जाधव यांनी घेतला. यासाठी प्रथम जेसीबी व ट्रॅक्टरने जमिनीचे सपाटीकरण करून जमीन दुरुस्त केली. त्यानंतर विहीर खोदली; परंतु विहिरीलाही पाणी कमी लागल्याने बोर मारली.दरम्यान, स्वत:चा खर्च फेल गेला. यामुळे मुबलक पाणी मिळत असल्याने या ‘ढग्या’ नावाच्या परिसरात ३० गुंठ्याच्या क्षेत्रात आल्याचे पीक आधुनिक ट्रिपद्वारे करण्यात आले. संपूर्णत: वाळूमिश्रित मातीत आले लावण्यात आले आहे. लहान बाळाप्रमाणे संगोपन करत भर उन्हात आले पिकाच्या उत्तम जोपासण्यामुळे केवळ २ महिने व २० दिवसांत आल्याचं दोन फुटांपर्यंत उंची वाढली आहे. सध्या हे पीक १५ ते २० बांडीवर असून, प्रतिगुंठा दोन-तीन गाड्या उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.सचिन जाधव यांनी आले पिकाची लागण ८ जून २०१५ रोजी केली असून, याची मशागत करण्यासाठी यापूर्वी दहा ट्रॉली शेणखत व एक हजार किलो गांडूळ खत वापरले आहे. या आल्याची लागण दीड फूट बेडवर केलेली असून, तीन कुडी पद्धतीने केली आहे. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. या अगोदर त्या जागेत ज्वारीचे पीक घेण्यात आले होते; परंतु त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने हे क्षेत्र कष्टाच्या बळावर बागायती करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत प्रयत्न करून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे पिकाच्या वाढीवरून दिसून येत आहे. यापूर्वी या क्षेत्रात आले पीक कधीही न घेतल्याने यंदा आले पीक घेण्याचा धाडसी प्रयोग त्यांनी केला. आले पिकाची अर्धा ते पाऊण फुटावर लागण करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती गावाच्या परिसरातील औषधविक्री करणाऱ्यापासून घेतली आहे. दीड महिन्यापासून पहिली आळवणी तर ८० दिवसांनंतर दुसरी आळवणी करण्यात आली. वीस दिवसांत दूध भर, तर पन्नास दिवसांनंतर पहिली बाळभर करण्यात आली. पाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी पाटाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी बीएपी १०-२६-२६ (मिश्रखत) पोटॅश, सिलिकॉन, सिक्वेन्स, हुमनी लागू नये, यासाठी निंबोळी पेंड, तांबा पेरी, अमोनिया आदी रासायनिक खतांचा वापर करून ५०० किलो गांडूळ खत वापरण्यात येत आहे. गोमुत्राची फवारणी दहा दिवसांतून एकदा ड्रिपवरून तर पुढील दहा दिवसांतून वरून फवारणी केली जात आहे.आंतरपिक मिरचीया ३० गुंठ्यातील आले लागवडीसोबत आंतरपिक घेण्यासाठी ३०० रोपे सितारा व लवंगी मिरची या जातीची लागवड केली. ठिबक सिंचनावर हे आंतरपिक असल्याने या मिरच्यांची रोपे देखील उत्तम आली आहेत. यातून होणारे उत्पादन पुण्याच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्याचा त्यांचा मानस आहे.
दुष्काळाची झळ; पण आल्यानं दिलं बळ!
By admin | Published: September 07, 2015 8:59 PM