अजय जाधव ।उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी याला अपवाद ठरले. तेथील युवकांनी भैरवनाथ देवस्थानच्या एक एकर जमिनीवर लावलेले शेकडो झाडे-फुलझाडे जगवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यांचे सलाईन लावले आहे.
साखरवाडी हे कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेले गाव. गावाची लोकसंख्या अवघी चारशेच्या घरात. त्यातील निम्मे लोक उपजीविकेसाठी बाहेरगावी राहतात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे हे गाव दळणवळणाच्या सुखसोयीपासून लांब राहिले आहे. विधायक कामाच्या पाठीमागे सर्व ताकदीसह एकसंघ राहणारे गाव. गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीत हिरवाई फुलवावी. या कल्पनेतून ग्रामस्थ, युवक-युवतींनी निर्धार केला. उजाड माळरानावर गेल्या वर्षी वेगवेगळ्या जातींची झाडे, फुलझाडे लावली होती.
यामध्ये पिंपळ, वड, आंबा, चिंच, चिकू, लिंब, चंदन, बेल, सीताफळ, फायकस, बोगनवेल, आकाशी, चाफा, बकुळा यांची रोपे लावली. रोपे लावून समाधान न मानता ते जगविण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे.पावसाळ्यात पाण्याची कमतरता नसते; पण उन्हाळा सुरू झाला की येथे पाणी-पाणी करण्याची वेळ येते. पाण्याची कमतरता असूनही ही झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थ गाडीतून पाणी आणून या झाडांना देतात. असे पाणी आणणे, देणे हे खूप कष्टदायी आहे. हे युवकांच्या लक्षात आले. त्यांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या.
रिकाम्या बाटलीत पाणी भरले. या बाटल्याना छोटी छिद्रे पाडली. त्यानी या बाटल्या झाडांना अडकवल्या. त्यातून थेंब थेंब पडणारे पाणी ठिबकू लागले. हे पाणी झाडांच्या मुळापर्यंत पोहोचू लागले. गारवा निर्माण झाला. ही संकल्पना चोरे येथील गणेश गुरव, विजय भोसले, शुभम साळुंखे यांच्यासह युवकांनी राबवली आहे. ही झाडे बहरली उजाड डोंगरावर सावली निर्माण होईल.युवकांनी घेतली जबाबदारी...पाणी देण्याच्या या सलाईनच्या प्रकाराने झाडांना पाणी हळूहळू मिळत आहे. बाटलीमधील पाणी संपले तर बाटलीचे झाकण काढून पुन्हा पाणी भरले जात आहे. ही जबाबदारी युवकांनी घेतली आहे. रिकाम्या टाकाऊ पाण्याच्या बाटलीच्या माध्यमातून झाडे जगतील.कऱ्हाड तालुक्यातील साखरवाडीच्या डोंगरावर गेल्यावर्षी लावलेली झाडे जगविण्यासाठी सलाईनच्या बाटल्या बांधण्यात आल्या आहेत.