वाई : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली असून एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता असल्याने आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. वाई शहरात बाजारादिवशी शुकशुकाट पसरला होता.
पुढील आदेश येईपर्यंत सोमवारी भरणारा वाई शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असून फक्त दैनंदिन बाजार भरणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. बाजारात गर्दी करू नये नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी केले आहे.
दरम्यान, सोमवार हा आठवडा बाजाराचा दिवस असून नेहमी वाई शहरात असणारी गजबज दिसून आली नाही तर बाजारासह, किसनवीर चौक, कचेरी परिसर तसेच मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.
जिल्ह्यासह वाईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून आजमितीला वाई शहरासह तालुक्यात रोज ३० रुग्ण कोरोनाचे सापडत आहेत, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून वाई नगर परिषदेने ठोस उपाय योजले असून सध्या आठवडी बाजार बंद करण्यात येणार आहे.
२९मार्केट
फोटो ओळ : वाई शहरात दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार बंद राहिल्याने बाजारपेठेत असा शुकशुकाट जाणवत होता. (छाया : पांडुरंग भिलारे)