धोकादायक गतिरोधक
कऱ्हाड : राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर ठिकठिकाणी धोकादायकरीत्या गतिरोधक उभारण्यात आले आहेत. गतिरोधकाची पूर्वसूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चालकांची फसगत होत असून वाहने आदळून अपघात तसेच नुकसान होत आहे. गोटे व खोडशीच्या हद्दीत असे धोकादायक गतिरोधक आहेत.
बिबट्याची दहशत
कऱ्हाड : विंग, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा बनला आहे. गावठाणाभोवती वस्तीवर त्याचा मुक्काम असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागले आहेत. त्याच्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात आहेत. सुतारकी वस्ती, कणसे मळा, मसोबा माळ, फडके वस्ती आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.
गवताचे साम्राज्य
कार्वे : कऱ्हाड ते कार्वेदरम्यान रस्त्यातील दुभाजकात सध्या गवत जोमाने उगवले आहे. दुभाजकातील झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दुभाजकाची स्थिती बिकट बनली आहे. शोभेची फुलझाडे गायब झाली आहेत. तसेच ठिकठिकाणी दुभाजकाचे दगडही कोलमडून पडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य नाहीसे झाले आहे.