संचारबंदीनंतरही आवश्यक कारणाच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर येत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशानुसार किराणा, भाजीपाला विक्रीसह शेतीशी निगडित दुकाने सायंकाळपर्यंत सुरू राहत होती. परिणामी, या-ना-त्या कारणाने रस्त्यावर वर्दळ सुरूच असायची. कऱ्हाड शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, रस्त्यावरून फिरणाऱ्यांकडे चौकशी केली तरी अत्यावश्यक सेवेतील कारण सांगून नागरिक निघून जात होते. त्यामुळे गर्दी नियंत्रित करताना पोलीसही हतबल झाल्याचे चित्र होते. बॅरिकेड्स असूनही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. मुख्य बाजारपेठेसह शहरातील इतर रस्त्यांवर गर्दी असायची. मात्र, मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी नवा आदेश काढून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील, असे सांगितल्यामुळे गर्दीवर त्याचा परिणाम झाला आहे. सकाळी अकरानंतर घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, रस्त्यावर तुरळक रहदारी दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास रस्ते पूर्णपणे ओस पडत आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे शटर डाऊन असल्यामुळे दत्त चौकापासून आझाद चौक, चावडी चौक तसेच कन्या शाळा मार्गावर पूर्णपणे शुकशुकाट जाणवत आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही स्थानिक वगळता इतर कोणाचीही वर्दळ दिसून येत नाही.
- चौकट
पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
संचारबंदी लागू केल्यापासून ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावरील वाहने अडवनू पोलीस संबंधितांकडे घराबाहेर पडण्यामागचे कारण विचारीत होते. मात्र, बहुतांश कारणे अत्यावश्यक सेवेची असल्यामुळे पोलिसांनी वाहने अडवूनही उपयोग होत नव्हता. मात्र, आता दुकानेच बंद झाल्यामुळे रहदारीही रोडावली असून, पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
फोटो : २१केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात बुधवारी दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता.