बावीस दुधेबावी : दहिवडी-फलटण राज्य मार्गावरील दुधेबावी गावाला मोठी धार्मिक परंपरा आहे. गावात असलेल्या प्राचीन दुधेश्वर मंदिराची कहाणी मोठी रंजक असून अशी अख्यायिका सांगितली जाते की, दुधेश्वर मंदिराच्या जागी पूर्वी एक बारव होती. त्यामध्ये दुग्धयुक्त पाणी होते. बारवातील दुधाळ पाण्यातून प्रकटलेल्या शंभूदेवाला दुधेश्वर तर गावाला दुधेबावी नावाने ओळखले जाऊ लागले. महादेव डोंगररांगेत वसलेल्या या गावाला मंदिरांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. दुधेबावीच्या भवानीदेवीला प्रतितुळजापूर म्हणून ओळखले जाते. गिरवीच्या कदम घराण्याला या देवस्थानाचा मान असतो. गावात दरवर्षी धनगर समाजाची महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तर माळी समाजाच्या वतीने भैरवनाथाची यात्रा साजरी केली जाते. सर्व सण, उत्सवाला संपूर्ण गाव एकत्र येतं. गावात व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगल्या विचारांची पेरणी केली जाते तर काव्य संमेलन, रांगोळी, चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. मंदिरांचं गाव दुधेबावी गावात यल्लमादेवी, ज्योतिबा, महालक्ष्मी, हनुमान, भैरवनाथ, गणेश, विठ्ठल-रुक्मिणी, दुधेश्वर, मरिमाता, जावळीचा नाथ, बिरदेव, तुळजाभवानी, पीरसाहेब, खंडोबा अशी विविध देवदेवतांची मंदिरे आहे. त्यामुळे गावात नेहमीच धार्मिक कार्यक्रम होत असतात. वर्षभरात १२ सण व विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम एकोप्याने साजरे केले जातात.
दुधाळ पाण्यातून प्रकटलेल्या दुधेश्वराचे ‘दुधेबावी’
By admin | Published: March 30, 2015 10:51 PM