सागर गुजरसातारा : भिन्न विचारांच्या शिवसेना, काँगे्रस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी राज्यात सत्ता मिळवताना भाजपला सत्तेपासून वंचित ठेवले. आता बाजार समित्यांमधील असलेले भाजपचे नगण्य स्थानही खोडून काढण्यात आले आहे. भाजपने बाजार समित्यांवर नेमलेल्या तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस या तिन्ही सत्ताधाऱ्यांनी कुरघोडी केली आहे.हा निर्णय जरी संपूर्ण राज्यासाठी घेण्यात आला असला तरी त्याचा परिणाम सातारा जिल्ह्यातील राजकारणावर मोठ्या प्रमाणात होईल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या या राष्ट्रवादी, काँगे्रसच्या ताब्यात आहेत.
सहकारातील प्राबल्य वाढविण्यासाठी भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना राज्यातील सत्तेच्या माध्यमातून संधी दिली; परंतु राजकीयदृष्ट्या त्याचा लाभ भाजपला उठवता आला नाही. गेल्या चार वर्षांच्या काळात बाजार समित्यांमध्ये भाजपला शिरकाव करता आलेला नाही. याउलट राष्ट्रवादीसोबत सत्तेवर असलेल्या शिवसेनेलाही सहकारात स्थान मिळविता आलेले नाही. आता शिवसेना यासाठी प्रयत्न करेल, अशी शक्यता आहे.राज्य शासनाने बाजार समित्यांमधील असलेल्या तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील १0 बाजार समित्यांमधील २0 तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत. भाजप शासनाच्या काळामध्ये अधिनियमानुसार १३ जून २0१५ रोजी बाजार समित्यांमध्ये तज्ञ संचालकांची नियुक्ती केली होती.
बाजार समित्यांमध्ये असलेल्या काँगे्रस व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या निर्विवाद सत्तेला चेक देण्यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. साहजिकच बाजार समितीच्या कारभारावर सत्ताधारी भाजपचा वचक राहिला होता.मंगळवारी कॅबिनेट बैठक झाली.
या बैठकीत या नियुक्त्या रद्द झाल्या. अॅड. नितीन शिंगटे, भिकू भोसले (सातारा), अॅड. भरत पाटील, दीपक महाडीक (पाटण), सुशांत निंबाळकर, गणेश कारंडे (फलटण), बबनराव कांबळे, जयवंत निकम (कोरेगाव), काशिनाथ शेलार, प्रदीप क्षीरसागर (वाई), विठ्ठल देशपांडे, अशोक परामणे (मेढा), बाळासाहेब खाडे, समीर जाधव (माण), भूषण शिंदे, अॅड. वैभव क्षीरसागर (खंडाळा), रामकृष्ण वेताळ, दीपक जाधव (कºहाड), अॅड. संदेश सातभाई, तानाजी देशमुख (खटाव) या तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार रद्द ठरणार आहेत.सध्याच्या घडीला किसन वीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना या मोठ्या संस्थांवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने घेतलेल्या निर्णयांना हद्दपार करण्याचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी सुरु केले आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात सहकार क्षेत्रातील निवडणुकांत व्यापकपणे सहभाग घेऊन राष्ट्रवादी, काँगे्रस या पक्षांना शह देण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, असे चित्र आहे.शिवसेना तज्ञ संचालक नेमणार का?मागील पाच वर्षांमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइ यांच्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती. तेव्हा बाजार समित्यांमध्ये तज्ञ संचालक नेमताना केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता हाच कित्ता शिवसेना गिरवणार? की तज्ञ संचालकांची नियुक्ती कायमस्वरुपी रद्द करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आहे.
- जिल्ह्यातील बाजार समित्यांची संख्या १0
- राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात सर्व संस्था
- महाबळेश्वर तालुक्यात बाजार समिती नाही
भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर २0१५ मध्ये बाजार समित्यांवर तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना या समित्यांवर प्रतिनिधीत्व मिळाले. बाजार समित्यांच्या कारभारावर वचक ठेऊन त्यात अधिक पारदर्शकता आणण्याचे कामही यामुळे झाले. आता तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे.- अॅड. भरत पाटील, तज्ञ संचालक पाटण बाजार समिती