सातारा : बाहेर पडलेली कडाक्याची थंडी त्यात असलेली नाताळाची सुटी याचा लाभ घेऊन अनेकांनी आजची सकाळ थोड्या उशिरा उजाडली असेल; पण गावाच्या प्रेमासाठी आणि सामान्यांच्या काळजीप्रती वाहतुकीची वर्दळ सुरू व्हायच्या आधी गोडोलीतील युवांनी भल्या सकाळी उठून अवघ्या काही तासांत वर्षानुवर्षे साठलेली घाण काढून आयलँडची स्वच्छता केली.
गाव करील ते राव काय करील, या उक्तीप्रमाणे सकाळी साडेसहापासून गोडोलीतील युवांनी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, राजू मोरे, चारू सकपाळ, विजयनाना मोरे, संदीप मोरे, सागर मोरे, सचिन बर्गे, मंगेश काशीद, लक्ष्मण माने, शशिकांत मोरे, सुभाष मोरे, गौरव पाटील, सागर जगताप, सुभाष शिंदे, सचिन काकडे यांनी सहभाग घेतला.
वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे करण्यात आलेले आयलँड आता विद्रूप दिसू लागले आहेत. गोडोली नाका येथे आयलँडशेजारीच रिक्षा थांबा असल्यामुळे कित्येकदा अवजड वाहने येथे वळवणं अशक्य होत आहे. तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधींनी निधीतील मलाई खाण्यासाठीच नागरिकांच्या माथी हे आयलँड मारल्याच्या तीव्र भावना स्थानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या होत्या. जागा व्यापून राहिलेल्या या आयलँडची किमान निगा राखण्याची अपेक्षाही फोल ठरल्याच्या भावना स्थानिकांनी तीव्र शब्दांत व्यक्त केल्या होत्या.
लोकभावनेचा आदर करत नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी तरुणाईला समाजमाध्यमाद्वारे साद घातली आणि भल्या सकाळी तरुणाई आयलँड स्वच्छतेसाठी दाखल झाली.कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता सुमारे तीन तास काम करून तरूणाईने आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी तरूणांनी आयलँडची स्वच्छता करून वाळलेली झाडेझुडपे, प्लास्टिकचे कागद, वेष्टानने आदी वस्तु काढल्या. यातील प्लास्टिक घंटागाडीतून कचरा डेपोकडे रवाना करण्यात आले, तर वाळका पाला पाचोळा आणि कागद तिथेच जाळण्यात आले. तीन तासांच्या श्रमदानानंतर आयलँड पुन्हा चकाचक दिसु लागला.
गोडोली नाका येथे झाडी आणि घाणीचे साम्राज्य असलेले आयलँड. दुसºया छायाचित्रात आयलँडची स्वच्छता करताना शेखर मोरे-पाटील, रवी पवार व गोडोलीकर.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत स्वच्छतागेल्या पाच वर्षांत या आयलँडची साधी देखभालही स्थानिक लोकप्रतिनिधींना करता आली नसल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने २१ डिसेंबरच्या अंकात ‘केवळ निधीसाठीच केला का हो अट्टाहास? या मथळल्याखाली प्रसिद्ध केले होेते. या वृत्ताची दखल संवेदनशील गोडोलीकरांनी घेतली आणि हक्काची एक सुटी गोडोली आयलँडच्या स्वच्छतेसाठी घालवली. आयलँडच्या स्वच्छतेबरोबरच गोडोली तळे परिसराचीही स्वच्छता करण्यात आली.
आयलँडची निर्मिती झाल्यापासून त्याच्या देखभाल दरुस्तीसाठी कोणीही उपाययोजना केल्या नाहीत. सौंदर्य वाढविण्यासाठी उभं करण्यात आलेलं हे धुड गोडोली विद्रूप करणारं ठरलं. यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला. ‘लोकमत’ने मांडलेल्या लोकभावना बऱ्याच बोलक्या होत्या. ‘लोकमत’ने मांडलेल्या प्रश्नावर उत्तर शोधणं ही आमचीच जबाबदारी आहे. सुटीचा दिवस बघून आम्ही स्वच्छता करण्याचं आवाहन केलं. भविष्यातही ‘लोकमत’ने मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, ही अपेक्षा.- शेखर मोरे-पाटील, नगरसेवक