सातारा , दि. १३ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेजसमोर टँकर उलटल्याने हजारो लिटर पेट्रोल वाया गेले. हा अपघात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. सुदैवाने चालक यातून बालंबाल बचावला.वाशीहून गडहिंग्लजकडे पेट्रोल घेऊन निघालेला एमएच ०९ सीयू ९७०४ या क्रमांकाचा टँकर येथील गौरीशंकर कॉलेजसमोर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक उलटला. त्यामुळे टँकरला गळती लागली. दुभाजकाशेजारून टँकर फरफटत काही अंतर गेल्यामुळे महामार्गावर सर्वत्र पेट्रोल सांडले होते. या अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. महामार्गावर पेट्रोल सांडल्यामुळे इतर वाहने घसरण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी टँकर महामार्गावरून बाजूला काढेपर्यंत त्या परिसरात ऐकरी वाहतूक सुरू ठेवली होती.सुमारे दोन तासांनंतर टँकर बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. टँकर चालक या अपघातात किरकोळ जखमी झाला. टँकरमधून नेमके किती लिटर पेट्रोल वाया गेले, हे अद्याप पोलिसांनाही समजले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती.