लोणंद : खंडाळा तालुक्यातील लोणंद औद्योगिक वसाहतीतील पुष्पक कंपनीत नवीन शेडवरील पत्रा बसविताना चाळीस फूट उंचीवरून पडल्याने परप्रांतीय मजूर ठार झाला. छोटेलाल कुमार आझाद (वय २१, रा. मानटांड, चितरपूर, जि. धनबाद, राज्य झारखंड) असे जागीच ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेची लोणंद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, येथील औद्योगिक वसाहतीतील पुष्पक कंपनीत रविवारी सकाळी नऊ वाजता नवीन शेडवरील पत्रा बसविण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यावेळी इम्रान अन्सारी छोटेलाल कुमार आझाद याच्यासह दोन कर्मचारी कंपनीतील शेडवर नवीन पत्रा बसविण्यासाठी चढले होते. वर गेल्यावर संरक्षक पट्टा बांधत असतानाच छोटेलाल आझाद याचा तोल गेल्याने बेल्ट बांधण्यापूर्वीच शेडवरून अंदाजे ३५ ते ४० फूट उंचीवरून तो खाली जमिनीवर पडला. तो पडल्याचे पाहून सर्वजण खाली उतरले. छोटेलाल यांच्या डोक्यास मार लागून त्यातून रक्त येत होते. उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी छोटेलाल आझाद यांची तपासणी केली असता मृत झाल्याचे सांगितले. इम्रान अन्सारी यांनी लोणंद पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. (वार्ताहर)
४० फुटांवरून पडून मजुराचा जागीच मृत्यू
By admin | Published: April 02, 2017 11:24 PM