दत्ता यादव ।सातारा : प्रसूती झाल्यानंतर मातेला बाळासह सुखरूप घरपोहोच पोहोचविण्याची पद्धत अलीकडे सिव्हिलमध्ये बंद होत असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या मातेला आणि तिच्या बाळाला चक्क वडापमधून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये मोजावे लागत असल्यामुळे अनेक महिला जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी येत असतात. रुग्णालयात येतानाही महिलांना अनेक यातना भोगाव्या लागतात. रुग्णावाहिकेला फोन केल्यानंतर तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने खासगी वाहनाने महिलांना रुग्णालयात आणले जाते. वाटेत उपचाराची गरज भासल्यास खासगी गाडीत सुविधा नसल्यामुळे माता आणि बाळ दगावण्याचेही प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली असून, मातेला आणण्यासाठी रुग्णवाहिका बहुतांशदा घरी जात असल्याचे पाहायला मिळते. परंतु यालउट चित्र रुग्णालयातून घरी जाताना मातेला अनुभवयास मिळते.
वास्तविक प्रसूतीनंतर मातेला आणि बाळाला सुखरूप घरी पोहोचविणे बंधनकारक आहे. असे असताना अलीकडे सिव्हिलमध्ये हा नियम धाब्यावर बसविला जातो. वाहन बिघडले असल्याचे सांगून प्रसूती झालेल्या मातेला आणि बाळाला खासगी वडापने तुम्ही घरी न्या, असा सल्ला दिला जात आहे. रोज पाच ते सहा महिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. हे खासगी वाहन चालकांना माहिती असल्यामुळे अनेक वाहन चालक सिव्हिलसमोर आपली वाहने उभी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. किलोमीटरवर भाडे न ठरवता थेट पाच ते दहा हजार रुपये भाडे सांगितले जात आहे.
हे ऐकूनच नातेवाइकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. एवढे भाडे द्यायचे कुठून? असा प्रश्न नातेवाइकांना पडत आहे. सिव्हिलमध्ये सर्व उपचार मोफत झाले असताना घरी जाताना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने नातेवाईक हतबल होत आहेत. नाईलाजास्तव नातेवाइकांना सिव्हिलसमोर उभी असलेली किंवा इतर ठिकाणाहून वाहने भाड्याने आणावी लागत आहेत.एकाच मार्गाची निवडप्रसूती झालेल्या माता एकाच भागातील आणि एकाच मार्गावर राहणाऱ्या असाव्यात, असा अलिखित नवा नियम म्हणे रुग्णालय प्रशासनाने काढला आहे. या नियमामध्ये जर कोणीच बसत नसेल तर त्यांनी आपापल्या खासगी वाहनाची सोय करून घरी जावे, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, असा दुर्मीळ योगायोग महिन्यातून नव्हे तर वर्षांतून तरी एकदा येईल का, असा प्रश्न नातेवाइकांमधून उपस्थित केला जात आहे.
प्रसूती झाल्यानंतर महिलांना घरी सोडण्यासाठी सिव्हिलमध्ये केवळ एकच गाडी आहे. मात्र, त्या गाडीचेसुद्धा पासिंग झाले नाही. इतर गाड्या आहेत. मात्र, नादुरुस्त आहेत. गाडीचे पासिंग झाल्यानंतर प्रसूती झालेल्या मातेंना घरी सोडले जाईल. मात्र, एका गाडीतून कितीजणांना सोडता येईल, हाही प्रश्न आहे.-उज्ज्वला माने,निवासी वैद्यकीय अधिकारी