म्हसवड : ढाकणी, ता. माण येथील शेतकऱ्यांची अनेक जनावरे दगावली आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे दुष्काळातून वाचलेली जनावरे डोळ्यादेखत तडफडत मृत्युमुखी पडत असल्याचेही उघड्या डोळ्याने पाहण्याची वेळ ढाकणी येथील शेतकऱ्यांवर आली आहे.गेल्या आठ दिवसांपासून ढाकणी येथील अनेक शेतकऱ्यांची जर्शी गाय, म्हैस, रेडी, शेळी या प्रकारची जनावरे मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे तर दुष्काळात छावणीवर करण्यात आलेल्या जनावरांना लसीकरणानंतर शेतकऱ्यांच्या जनावरांना वर्ष उलटूनही लसीकरण न केल्याने मृत्यू पावल्याची चर्चा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. या गावातील जनावरे अज्ञात रोगामुळे दगावली का? मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे दगावली? पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे याकडे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षात या गावाला भेट देऊन उर्वरित जनावरांचे जीव वाचवणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.त्यानंतर २६ जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला. जनावरांचे लसीकरण व्हावे, यामध्ये ग्रामस्थांनी म्हटले आहे की, मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे बरीचशी जनावरे आजारी पडून दगावली आहेत. तरी ढाकणी येथील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी करून त्वरित लसीकरण करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांवर आलेल्या या मोठ्या संकटापासून जनावरे वाचतील. या ठरावाची प्रत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ढाकणी येथील शेतकरी धर्माजी खाडे यांची जर्शी गाय ८० हजार रुपये किमतीची, वसंत ओंबासे २५ हजार जर्शी गाय, भानुदास खाडे ४० हजार जर्शी गाय, संजय साबळे यांची १० हजार रुपये किमतीची रेडी, ५० हजार रुपये किमतीची म्हैस अशी दोन जनावरे, प्रकाश खाडे ५ हजारांची म्हैस तर शिंदे वस्तीवरील दोन जनावरे अशी लाखो रुपये किमतीची जनावरे दगावली आहेत. (प्रतिनिधी)डॉक्टर आलेच नाहीत...आठ दिवसांपूर्वी जनावरे दगावण्यास सुरुवात झाल्यानंतर वडजल उपकेंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर डॉक्टरांचा दोन दिवस वाट पाहूनही डॉक्टर आले नाहीत. वडजल येथे ग्रामस्थ गेले तरी उपकेंद्रात डॉक्टर हजर नसल्याने भेट झाली नाही.
दुष्काळातून वाचली; त्यांना कुत्री चावली
By admin | Published: January 30, 2015 10:23 PM