संतोष खरात ।लोणंद : लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला. मात्र, या औद्योगिकीकरणामुळे लोणंदचा विकास झालाय खरा; पण प्रदूषणामुळे स्थनिकांचाच नव्हे तर शेतपिकांचाही श्वास आता गुदमरायला लागलाय.
औद्योगिकीकरणाचा फायदा स्थानिकांना होत नाही, हेच या विकासाचे दुर्दैव म्हणावे लागेल. या औद्योगिकीकरणामुळे विकास झाला असला तरी लोणंदकर मात्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेत. खंडाळा तालुक्यातील लोणंद म्हणजे कांद्याच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध गाव. औद्योगिक वसाहती स्थापन होण्यापूर्वी हा खंडाळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध होता. उजाड माळरान जमिनी आाणि पावसाचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.
वीर धरण अगदी शेजारी असूनही दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजलेला. वाढती बेरोजगारी आणि शेतीला पाणी नसल्याने अनेकांनी आपल्या संसाराचा गाडा गावाकडून मुंबई, पुण्याकडे वळविला होता. या भागातील काही जागा मालकांचा या औद्योगिक वसाहतीस विरोधही होता. या विरोध करणाºयांना स्थानिक नेते व त्यांच्या सहकाºयांनी औद्योगिक वसाहतीबाबतचे महत्त्व पटवून दिले. औद्योगिक वसाहतीमुळे लोणंदच्या युवकांना रोजगार उपलब्ध होणार होता. या पडीक जमिनीला चांगला भावही मिळणार असल्याने विरोधक शांत झाले. लोणंदमध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या नामफलक मोठ्या दिमाखात उभा राहून लोणंदकरांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र रोजगाराचे स्वप्न अर्पूण राहिले.
लोणंदमधील जनतेने लोणंदमध्ये औद्योगिक वसाहतीबाबत काही स्वप्ने पाहिली होती. ज्या भावनेने व समर्पण वृत्तीने औद्यागिक वसाहत स्थापन होण्यासाठी प्रयत्न केले गेले व औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी ज्या लोकांनी त्याग केला त्यांना मात्र दुर्दैवाने अपेक्षित फळ मिळाले नाही.- अॅड. बाळासाहेब बागवान, ज्येष्ठ नेतेज्या लोकांनी यासाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या. त्या भूमिपुत्रांना आता प्रदूषणामुळे जगणे असह्य झाले आहे. औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यावर लोणंदचीच नव्हे तर तालुक्याची बेराजगारी कमी हाईल, अनेक भूमिपुत्रांना कायमचा रोजगार मिळेल ही भाबडी आशा फोल ठरली आहे.- प्रा. रघुनाथ शेळके, लोणंद