सागर गुजरसातारा : जिल्ह्यात सर्वच कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. गाळप परवाने मिळण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे.सहकारी व खासगी तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या कारखान्यांना पुणे साखर आयुक्तांमार्फत गाळप परवाने दिले जातात. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सप्टेंबरअखेर परवान्यांसाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदत होती. मंत्री समितीच्या बैठकीत कारखान्यांना काही अटी व नियम लागू करून गाळप परवाने दिले जातात. यंदा मात्र परवाने मिळण्याच्या वेळेत नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती झालेली नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्री समितीची बैठक होईल, या बैठकीत ठरल्यानंतर गाळप परवाने दिले जाणार आहेत.यंदा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात विधानसभेची निवडणूक लागली. २ नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होणे अपेक्षित होते; परंतु सत्ता स्थापनेची हुतूतू सुरू झाली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने त्यांना शिवसेनेच्या आधारावरच पुन्हा बहुमत मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह प्रमुख कॅबिनेट मंत्रिपदासाठी अडून बसली असल्याने मंत्रिमंडळ स्थापनेसाठी अजून किती कालावधी लागतोय, याची वाटच पाहावी लागणार आहे. या परिस्थितीत साखर हंगाम लांबण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, साखर आयुक्तांनी त्यांच्या पातळीवर साखर गाळप परवाने देण्याचा निर्णय घेतला तर कारखान्यांना वेळेत परवाने मिळून गाळपही सुरू होऊ शकते, यासाठी सर्वच कारखान्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसºया बाजूला मराठवाड्यातील कारखाने डिसेंबरमध्ये परवाने मिळावेत, यासाठी आग्रही असल्याचे समजते.प्रमुख कारखाने आणि त्यांचे मागील वर्षाचे ऊस गाळप
- कृष्णा सहकारी साखर कारखाना : ११ लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप; १४ लाख ९३ हजार ३६० पोती साखर निर्मिती
- किसन वीर कारखाना : ५ लाख ७७ हजार ९५० मेट्रिक टन ऊस गाळप; ६ लाख २ हजार ३७० पोती साखर निर्मिती
- बाळासाहेब देसाई कारखाना : १ लाख ९६ हजार ३१५ मेट्रिक टन ऊस गाळप; २ लाख ३० जार ५७५ पोती साखर निर्मिती
- प्रतापगड : १ लाख ७५ हजार ८१२ मेट्रिक टन ऊस गाळप; १ लाख ९२ हजार ७०० पोती साखर निर्मिती
- खंडाळा : २ लाख ३६ हजार १४३ मेट्रिक टन ऊस गाळप; २ लाख ३२ हजार ६५० पोती साखर निर्मितीचौकट...यंदा टनेज वाढणारयंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ऊन आणि पाऊस असे वातावरण राहिल्याने ऊस उत्पादनासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. याचा चांगला परिणाम होऊन उसाचे टनेज वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.कोट....कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. ऊसशेतीचे मोठे क्षेत्र हे कृष्णा नदीकाठी होते. त्यात पाणी शिरल्याने यंदा ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. मागील वर्षी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा मात्र कारखान्याकडील नोंदीनुसार १२ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे.- एस. एन. दळवी, कार्यकारी संचालक, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुक