कोयनानगगर : कोयना परिसरात निसर्गसौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे. येथे निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. परीणामी येथे चांगल्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो. मात्र सध्या येथील डोंगररांगांना वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डोंगररांगा काळ्या पडू लागल्या आहेत. तसेच येथील औषधी वनस्पती देखील नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोयना परिसरात निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटनाला चांगला वाव आहे. मात्र नानेल, शिवंदेश्वर, हेळवाक, गोकूळ, संगमनगर, माडखोप, नवजा इत्यादी ठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या सर्वाकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण पे्रमींमधून होत आहे. परिसरातील शाळा तसेच विविध मंडळांच्या वतीने देखील येथे दरवर्षी वृक्षलागवड केली जाते; पण या वणव्यामुळे ही झाडे देखील जळून जात आहेत. तसेच औषधी वनस्पती आणि रानमेव्याची झुडपे देखील या वणव्यात नष्ट होत आहेत. वनसंपदा नष्ट झाल्याने येथील वन्य प्राण्यांना पुरेसे संरक्षित वनक्षेत्र शिल्लक राहत नाही. वन्यप्राण्यांना नाईलाजाने अन्नाच्या शोधात शेतात आणि गावात यावे लागते. वनविभागाने वणवे लावण्यावर निर्बंध आणण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)कोयना परिसरात अज्ञातांकडून दरवर्षी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असणारे कोयनानगर हे ठिकाण आणि परिसर भकास दिसू लागला आहे. त्याकडे वनविभागाने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी. - योगेश देसाई, मानाईनगर
वणव्यामुळे वनसंपदा धोक्यात
By admin | Published: February 25, 2015 9:26 PM