सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्यांना महापूर आला आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार, दि. ५ आॅगस्ट रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये माण तालुक्याला वगळण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. शहराशी जोडलेल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तीनजणांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे.
रविवारीही दिवसभर पाऊस पडत होता. सोमवारीही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे.