पाचगणी : दानवली (ता. महाबळेश्वर) येथे अतिवृष्टीमुळे डोंगर काठावरील भातशेती पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे.
डोंगरकुशीत वसलेल्या दानवली गावात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. डोंगराच्या काठावर असणाऱ्या या भागात शेतीला यावेळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे ही सर्व शेती वाहून गेली आहे. तसेच पाण्याबरोबर आलेल्या दगड-धोंड्यामुळे शेती करण्यालायक जमीन राहिलेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
दानवलीतील शेतकरी भाऊसाहेब दानवले, किसन दानवले आणि अन्य शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्याने वाहून गेली असून, शेत दगड-गोटे आणि माती यांनी पूर्णपणे भरून गेले आहे. या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा पंचायत समितीचे कृषी अधिकारी आप्पा जाधव व कृषी अधिकारी संतोष जगताप यांनी केला आहे.
(कोट)
आमच्या वडिलांनी कष्ट करून तयार केलेली ही शेती नैसर्गिक आपत्तीने वाहून नेल्याने आमचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून आम्हाला मदतीचा हात मिळावा, हीच अपेक्षा.
- भाऊसाहेब दानवले, शेतकरी
फोटो आहे...
३१ पाचगणी
दानवली (ता. महाबळेश्वर) येथे अतिवृष्टीमुळे डोंगर काठावरील भातशेती पुराच्या पाण्याने वाहून गेली.