वाई
वाईच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत गाढवेवाडी पुलाला भगदाड पडले असून नांदगणे पूल वाहून गेला आहे.
धोम धारणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन तो ६३. १८ टक्के झाला आहे. धरणाच्या खालील क्षेत्रातील ओढ्यांच्या पाण्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे.
बुधवारी दि. २१ जुलै\च्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने बलकवडी- नांदगणे-फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टी झाल्यानंतर त्या ओढ्याला येणाऱ्या पाण्याचा जलस्त्रोत मोठा असल्याने पाणी परिसरातील शेतात घुसले. यामुळे उभ्या पिकाचे तसेच शेताचे बांध, ताली पडल्यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता रस्ता करतेवेळी संभाव्य धोका शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. पण त्यावेळेस तांत्रिक कारण पुढे करत पूल बांधण्यात आला. यामुळे गेली तीन वर्षे ओढा शेतात घुसून पुरामुळे शेतीचे नुकसान होत आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट
वास्तविक पाहता रस्ता तयार करताना आम्ही त्यांना संभाव्य धोका सांगितला होता. पण त्यावेळेस आमच्या मताकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी अतिवृष्टी झाली की पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात शिरल्याने पिकाचे व शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, तरी संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतकऱ्याचे होणारे नुकसान थांबवावे.
राहुल भिलारे, स्थानिक नागरिक