सातारा : तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे अनेक घरांना हाय व्होल्टेजचा झटका बसला. यामुळे ३० ते ३५ घरांमधील टी. व्ही. जळले तर कोणाचा मीटर जळला आहे. शनिवारी सायंकाळी अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे काळोशीत घबराट निर्माण झाली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथे स्थानिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याची तक्रार महावितरणकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोरोना महामारी सुरु असतानाच त्यात आर्थिक फटका बसल्यामुळे लोक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे महावितरणने नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आम्ही महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.