मालगाव : मिरज तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गोठा बांधकामाची बिले रखडल्याने कर्जे काढून गोठा बांधकाम पूर्ण केलेले लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कुशल-अकुशलचा निकष पूर्ण नसल्याने बिले मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. निकष पूर्ण करण्यासाठी अकुशलची कामे राबविण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांची मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांनी झाडाझडती घेतली. बैठकीत अकुशलची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवकांना दीड महिन्याची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. गोठा बांधकामाची कामे ही रोजगार हमी योजनेंतर्गत राबविली जात असल्याने या कामास निकष ठरविण्यात आला आहे. ६० टक्के मजुरीवर (अकुशल) व ४० टक्के बांधकाम साहित्यावर (कुशल) खर्च झाला पाहिजे, असा निकष आहे. या निकषानुसार गोठ्याची कामे झाली, तरच नवीन कार्यप्रणालीनुसार आॅनलाईन बिले स्वीकारली जातात. लाभार्थ्यांनी वेळेत बिले मिळतील या आशेने कर्जे काढून गोठा बांधकाम पूर्ण केले असले तरी, ही कामे निकषाच्या उलट झाली आहेत. गोठा बांधकाम साहित्यावर ८० टक्के व मजुरी केवळ २० टक्के खर्च झाल्याने लाभार्थ्यांची बिले रखडली आहेत. वाढत्या तक्रारींची दखल घेत सभापती दिलीप बुरसे, सदस्य सतीश नीळकंठ व गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. (वार्ताहर)
अपुऱ्या निकषाने गोठा बांधकामाची बिले रखडली
By admin | Published: June 14, 2015 12:02 AM