वाई : येथील लक्ष्मी मंदिरात परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या एका दुर्मीळ जातीच्या घुबडाला प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. प्राथमिक उपचारानंतर हे घुबड वनविभाच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.वाई येथे राहणारे दत्तात्रय तुपे यांना विष्णू मंदिराजवळ एक दुर्मीळ जातीचे घुबड शांत अवस्थेत बसल्याचे आढळून आले. पाहणी केल्यानंतर ते घुबड जखमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तुपे यांनी प्राणीमित्र डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर सूर्यवंशी यांनी जखमी घुबडावर प्राथमिक उपचार करून त्याला वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या ताब्यात दिले.या घुबडावर दोन दिवस उपचार केले जाणार आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात पुन्हा सोडण्यात येणार असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत वाई शहर व परिसरातील अनेक पशू-पक्ष्यांना आतापर्यंत जीवदान मिळाले आहे. दुर्मीळ प्रजातीच्या घुबडाचा जीव वाचल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वाईतील प्राणीमित्रांमुळे दुर्मीळ घुबडाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:25 PM