चाफळ (जि. सातारा) : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील पाडळोशी येथील आरोग्य उपकेंद्र सध्या चर्चेचा विषय ठरू पाहत आहे. या आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका गाव व परिसरातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा देत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील जनतेची आरोग्य सेवाच सलाईनवर असल्याचे चित्र आहे.
चाफळपासून दहा किलोमीटर अंतरावर पाडळोशी गाव आहे. याठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रांतर्गत असणाºया या उपकेंद्रात पाडळोशी, नारळवाडी, मसुगडेवाडी, मुसळेवाडी, पाठवडे, बाटेवाडी, सडावाघापूर, सडाकळकी, सडानिनाई, सडादाढोली, धायटी, कांबळेवाडी, खुडेवाडी आदी गावांचा समावेश आहे. पोलिओ लसीकरण वगळता येथील सेविका कित्तेक दिवस या गावांकडे फिरकत नाही.
सध्या स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया यासारख्या आजारांनी सगळीकडे थैमान घातले असताना ही सेविका उपकेंद्र्र सोडण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित सेविकेने लसीकरणासह दर महिन्याला प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन तपासणी करावयाची असते. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आरोग्य उपकेंद्रात सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश वेळा सेविका उपकेंद्रात हजरच नसतात. आणि असल्याच तर रुग्णांना पुरेशी औषधे उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत उपचाराविना परत पाठविले जाते.
शासनाने ग्रामीण भागामध्ये बाल व माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच सुरक्षित प्रसूती होण्यासाठी लाखो रुपये खर्चून उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. यात प्रसूती खोलीही बांधण्यात येऊन पुरेशी औषध सामग्री पुरविलेली आहे. मात्र, या उपकेंद्रात प्रसूतीच केली जात नाही. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. पाडळोशी येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर त्या सेविकांना मी दवाखान्यात बोलावून समज दिली होती. कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबंधित सेविका कामकाजात सुधारणा करत नसेल तर याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून चौकशीअंती योग्य ती कारवाई आरोग्य खात्यामार्फत करण्यात येईल. ग्रामस्थांनी सेविकेबाबत लेखी तक्रार दिल्यास कारवाई करणे सोईचे ठरेल.- डॉ. महेश पाटील, वैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र, चाफळ