कुडाळ : ‘शिक्षकांच्या आदर्श कामाच्या पद्धतीमुळेच आज जावळी तालुक्याचा शिक्षण विभाग जिल्हा पातळीवरून राज्य पातळीपर्यंत गौरवला जात आहे. तालुक्यातील शिक्षकांनी शिष्यवृत्तीचा ‘जावळी पॅटर्न’ टिकवण्यासाठी केलेले शैक्षणिक काम हे आदर्शवत असे आहे. यापुढेही शिक्षकांनी जावळी पॅटर्नचा दबदबा कायम ठेवून शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढवावा,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.जावळी पंचायत समितीच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त आयोजित शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपसभापती निर्मला कासुर्डे, रूपाली वारागडे, मोहन शिंदे, हणमंत पार्टे, सारिका सपकाळ, संगीता चव्हाण, गटविकास अधिकारी गजानन भोसले, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, नायब तहसीलदार सुरेश शिंगटे, विजय बांदल उपस्थित होते.मोहन शिंदे म्हणाले, ‘पुरस्कार म्हणजे पाठीवरची थाप आहे. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांची कामाची जबाबदारी वाढली आहे.’यावेळी सुभाष जाधव, पवित्रा फरांदे, राजेंद्र मोहिते, संपत सुर्वे, प्रमोद शिर्के, दिलीप जाधव, वर्षा शिंगटे, शांताराम ओंबळे, अनिल भणगे, श्रीकृष्ण दळवी, अण्णासाहेब दिघे, विजय पवार, बाळु दिवटे, विजया जोशी, अंजना कदम तर आदर्श केंद्र प्रमुख म्हणून संपत धनावडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अशोक लकडे, नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. रमेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
शिक्षकांमुळेच जावळीचे नाव राज्यपातळीवर
By admin | Published: September 06, 2015 8:39 PM