फलटण, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या कार्यालयावर ही नामुश्की ओढवली आहे.
लाखोंचा महसूल मोजणी व नक्कल सेवामधून महसूल विभागास मिळूनही काही हजार थकीत बिल भरायला या कार्यालयाकडे पैसे नाहीत, हे आज स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचाऱ्याना अंधारात बसून काम करावे लागत असून, अनेक कर्मचारी वीज नसल्याने विनाकाम बसून दिवस काढत आहेत. वीज नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, विनाकारण नागरिकांना मनस्ताप होत आहे.
सध्या महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीची मोहीम अधिक व्यापक केली आहे. महावितरण कार्यालयाने थकीत वीज बिलाबाबत वारंवार सूचना देऊनही कार्यालयातील जबाबदार अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कार्यालयात अंधारात बसण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली आहे. महावितरण कार्यालयाने वीज तोडण्यापूर्वी आगाऊ नोटीस देणे बंधनकारक आहे, असे असताना नोटीस न देता वीज तोडली गेली का? हे ही महत्त्वाचे आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी अधिक असते. त्यात मोजणी फी, नक्कल अर्ज, मोजणीची कामे ही संगणकातून केली जातात. दरम्यानच्या दोन दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यालयाचे काम ठप्प झाले असून, वीज कनेक्शन तत्काळ सुरू झाल्याशिवाय कार्यालयीन काम करणे अवघड होणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत चालू होत नाही तोपर्यंत नागरिकांच्या कामास दिरंगाई होणार, हे निश्चित आहे.
अनेक मोजणी अर्जांची चलने काढण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यापूर्वी नगर भूमापन कार्यालय फलटण यांचाही वीज पुरवठा अनेक महिने बंद होता, तो मागील महिन्यापासून वीज बिल भरल्यानंतर सुरू झाला आहे.
भूमी अभिलेख कार्यालयाची सतत वीज तोडली जात असून, ही परंपरा खंडित होऊन विना अडथळा नागरिकांना सेवा मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे. महसूल विभागाने यात लक्ष घालावे व वीज भरणाबाबत वेळच्या वेळी संबधित विभागाकडून निधी मिळावा, जेणेकरून शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांवर अशी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही.