महाबळेश्वर : सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे. या धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक, बाजारपेठ व विविध पॉइंटवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्यांमुळे महाबळेश्वर, पाचगणी या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल अनुभवायास मिळत आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वरचे रूप पूर्णपणे पालटले आहे. धुंद वातावरणासह संततधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. अनेक हौशी पर्यटक बाजारपेठेमध्ये पावसाच्या सरी अंगावर घेत घोडेसवारीचा आनंद घेत आहेत.गर्दीमुळे पर्यटकांना नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटकांची दुपारी भर पावसात नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकसह विविध प्रेक्षणीय स्थळांवर गर्दी होत आहे. महाबळेश्वरची शान असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा पर्यटकांना खुणावत असून, मुसळधार पावसाने धबधब्याचे नयनरम्य रूप पाहावयास मिळत आहे तर निसर्गरम्य आंबेनळी घाटातील उंचावरून कोसळणाऱ्या लहानमोठ्या धबधब्यांवरदेखील पर्यटक पाहावयास मिळत आहेत.
सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले, वर्षा सहलीसोबतच निसर्गाचा लुटताहेत आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 3:42 PM