सातारा : राज्यात खरीपात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका झाल्या. तरीही विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ होत होती. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना ६३ मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीतच शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच कोटी जमा झाले आहेत.शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागांसाठीही ही योजना आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या पावणे तीन लाखांच्या घरात आहे. पण, खरीप हंगामात २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने राज्यातील शेकडो मंडले नुकसान भरपाईसाठी पात्र ठरली.
शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी विविध कारणे आहेत. यामधील एक म्हणजे हंगामात प्रतिकूल परिस्थितीत सलग २१ दिवस पावसाचा खंड राहिल्यास त्या मंडलातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळते. सातारा जिल्ह्यातील अशा मंडलची संख्या ६३ आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक १३ मंडले आहेत. यानंतर खटाव तालुक्यातील ९, कोरेगाव ८, फलटण ७, सातारा तालुका ६, वाई, पाटण आणि माण तालुक्यातील प्रत्येकी ५, खंडाळ्यातील ३ आणि जावळीतील २ मंडलांचा समावेश आहे. यामधील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरले आहेत.साताऱ्यात पावणे दोन लाख अर्जधारकांना फायदा..सातारा जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलात सलग २१ दिवस किंवा त्याहून अधिक पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळणार आहे. सुमारे १ लाख ७३ हजार एेवढी विमा घेतलेल्या अर्जधारकांची संख्या आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, खरीप कांदा या ९ पिकांसाठी विमा योजना होती.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा..
अग्रीममध्ये सध्या बाजरी, भात, नाचणी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून लाभ मिळत आहे. त्यातच आता सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याबाबत विमा कंपन्या तांत्रिक कारणे देत आहेत. तरीही जिल्हा प्रशासनाकडून सोयाबीन उत्पादकांनाही लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.४० हजार शेतकऱ्यांना साडे सहा कोटी...जिल्ह्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. विमा कंपन्याकडून ६ कोटी ४५ लाख रुपये अग्रीमचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यातील अडीच कोटी जमा झाले आहेत.
आयुक्तांनी अपिल फेटाळलेले..
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याबाबत आदेश दिला होता. याविरोधात कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल केलेले. या सुनावणीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे गेल्या होत्या. त्याठिकाणी सुनावणी होऊन कंपनीचे अपिल फेटाळले. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
जिल्ह्यात पावसाचा २१ दिवस खंड पडलेल्या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीमचे सुमारे साडे सहा कोटी रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर अडीच कोटी रुपये जमा झालेले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठाम भूमिका घेतल्याने यश मिळाले आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी