सातारा : राज्यपाल रमेश बैस हे आजपासून महाबळेश्वर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते थेट महाबळेश्वरला जाण्याऐवजी वाईमध्ये उतरुन पुढे भिलार आणि महाबळेश्वर असा प्रवास करणार आहेत. त्यामुळे महाबळेश्वरकडून येणारी आणि जाणारी वाहतूक रोखून ठेवण्यात आली आहे.
वाई - महाबळेश्वर मार्गावर वाहतूकीची मोठी कोंडी झाली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या उन्हात पर्यटकांनाही त्रास होत आहे. यापूर्वी नियोजित असलेला राज्यपालांचा महाबळेश्वर दौरा रद्द करण्यात आला होता.
सकाळी अकरा वाजता राज्यपाल वाई येथील किसनवीर महाविद्यालयाच्या मैदानावर हेलिकॉप्टरने उतरले असून तेथून ते वाहनाने बेल एअर हॉस्पिटल व भिलारला जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक वळविण्यात आली आहे. तर वाईकडे येणारी वाहतूक थांबवून ठेवण्यात आली आहे. भिलारमधील पुस्तकांच्या गावाला भेट दिल्यानंतर दुपारी दोन वाजता महाबळेश्वर पोहचणार असून आजचा दिवस राखीव आहे.