स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागला असून, मतदार आणि कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाकडून आचारसंहिता लागू झाल्यापासून दररोज नाकाबंदी, अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई सुरू आहेत. मात्र, या कारवाया अगदीच मोघम स्वरुपाच्या आहेत. त्यामुळेच परजिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची वाहतूक जोमात सुरू आहे.प्रशासनाकडून आचारसंहिता लागू झाल्यापासून दररोज नाकाबंदी, गावठी दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई सुरू आहेत. मात्र, या कारवाया अगदीच मोघम स्वरुपाच्या आहेत. दहा वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले असले तरी आजही अनेक ढाबे व गावांमध्ये गावठी दारू उपलब्ध आहे. ही हातभट्टीच्या दारूची निर्मिती आणि वाहतूक सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतून जोमात सुरू असल्याचेच दिसून येत आहे.कोणत्याही निवडणुकीत दारू ही ठरलेली असते. आताची लोकसभा निवडणूकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मतदार व कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी दारूचे साठे केले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागला असून, कार्यकर्त्यांच्या जेवणावळी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पक्ष व उमेदवारांकडून हॉटेल व ढाबे बुक करण्यात आले आहे. कार्यकर्ते व मतदारांना खूश करण्यासाठी त्याची खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली आहे. ही सोय करत असताना काही लोकांना त्याचे कंत्राट दिले आहे. ते परराज्यातून चोरट्या मार्गाने गावठी व बनावट दारूची तस्करी करत आहेत.५९ जणांना अटक; साडेनऊ हजार लिटर दारू जप्तराज्य उत्पादन शुल्ककडून ११ मार्चपासून ७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी ५९ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ हजार ५३० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच ११ वाहनांसह २९ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.चव अन् किमतीत बदलजिल्ह्यातील अनेक बारमध्ये मिळणाऱ्या दारूमध्ये फरक असल्याचीही चर्चा आहे. कोणत्याही एका ब्रँडची दारू प्रत्येक बारमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये रंगामध्ये तसेच चवीमध्येही बदल जाणवत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.बार, दारू दुकाने तपासणीची मागणीअनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूचा साठा केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क संबंधित बार, दुकाने यांचा स्टॉक तपासून त्यांच्याकडून विक्री केली जाणाऱ्या दारूची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
परराज्यातून बनावट दारूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:24 PM