फलटण : ‘काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी तालुक्यातील फळाबागांना त्याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षाबगांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बरड कृषी मंडलातील कुरवली बुद्रुक, राजुरी, गोखळी, निरगुडी आदी भागातील द्राक्षाबागांची पाहणी केल्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कृषी सहायक, कृषी मंडलाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब आदी फळाबागा आणि भाजीपाला पिकांची पाहणी करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुरवली खुर्द येथील सचिन सांगळे व सुरेश सांगळे यांच्या तसेच निरगुडी येथील जयपाल सस्ते, प्रदीप सस्ते, सर्जेराव सस्ते, दत्तात्रय सस्ते, गणपतराव सस्ते आदी शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत मंडल कृषी अधिकारी तानाजी चोपडे, निरगुडी कृषी सहायक प्रवीण बनकर व शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील विडणी व बरड कृषी मंडलातील ११ गावांतील ८० शेतकऱ्यांच्या ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सर्वप्रथम द्राक्ष पीक बाजारात विक्रीस गेल्यास अधिक दर मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकरी द्राक्षांची छाटणी अगोदर करून बार लवकर धरतात. त्याप्रमाणे अनेकांनी बार धरल्याने द्राक्षे तयार होऊन या सप्ताहात बाजारात विक्रीस येणार होती. मात्र, अवकाळी पावसाने तयार झालेल्या या द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात ६५ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. तथापि, त्यापैकी अनेकांनी छाटणी करून बार न धरल्याने त्या बागा अवकाळी पावसाच्या नुकसानीपासून बचावल्या आहेत. (प्रतिनिधी)...८० शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसानफलटण तालुक्यातील ८० शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार विडणी मंडलातील धुळदेवमध्ये एका शेतकऱ्याचे 0.८० हेक्टर, सासकल पाच शेतकरी २.५३ हेक्टर, गिरवी आठ शेतकरी ३.८७ हेक्टर, विंचुर्णी एक शेतकरी 0.४० हेक्टर, निरगुडी ४३ शेतकरी १५.२७ हेक्टर. बरड मंडलातील कुरवली सहा शेतकरी ८.२० हेक्टर, पिंंप्रद तीन शेतकरी १.१० हेक्टर, वडले चार शेतकरी १.४० हेक्टर, खटकेवस्ती सात शेतकरी ३.८० हेक्टर, हणमंतवाडी एक शेतकरी 0.४० हेक्टर, राजुरी एक शेतकरी 0.६० हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
अवकाळीचा फलटणला फटका
By admin | Published: November 21, 2014 9:12 PM