सातारा : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजामुळे भिंत कोसळ्याचा सूर अनेकांनी आळविला होता. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी देवीची विसर्जन मिरवणूक चक्क डॉल्बीविरहित काढण्यात आली. यामुळे मंडळांनी बोले मामांना एक प्रकारे श्रद्धांजलीच वाहिली आहे. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.नवरात्राचे नऊ दिवस देवीची विविध रूपे आणि रास-दांडियाचा माहोल काल संपला. तरूणांचा अलोट उत्साह आणि भक्तांची गर्दी यामुळे नऊ दिवस जणू सातारा झोपलाच नाही. पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात करणारे सातारकर रात्री दांडिया खेळूनच घरी जात होते. गेल्या नऊ दिवस देवीची आराधना आणि भक्ती रसात डुंबलेल्या सातारकरांनी काल, शुक्रवारी देवीला निरोप दिला.साताऱ्यातील देवींच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी अकरापासूनच झाली. चौकाचौकांत सौभाग्यवतींनी देवीची आरती करून ओटी भरून देवीला निरोप दिला. या मिरवणुकीत कुठेही डॉल्बीचा दणदणाट नव्हता, हे विशेष. संध्याकाळी सातारकर भक्त मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरले. त्यामुळे मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अलोट उत्साह आणि पारंपरिक वाद्यांच्या संगतीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. देवीचे विसर्जन पाहण्यासाठी नागरिकांनी मंगळवार तळ्याला वेढा घातला होता. दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सुट्यांमुळे कासला आलेले पर्यटक परतत असताना गर्दीत अडकून पडले. दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनधारकांच्या नाकी नऊ आले. (प्रतिनिधी)लिलावांना गर्दीदेवीची मूर्ती विसर्जनासाठी मंडळाबाहेर काढल्यानंतर लगेचच येथे नारळ, ब्लाऊज पीस, चोळीचे खण आणि साड्यांचे लिलाव सुरू करण्यात आले. मोती चौकात या लिलावासाठी भक्तांनी गर्दी केली होती. नारळ दहा रुपये, ब्लाऊस पीस पंधरा तर चोळीचे खण पंचवीस रुपयांना मिळाले. साड्या शंभर रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत होत्या. विशेष म्हणजे, या लिलावासाठी पुरुषांपेक्षा महिला भक्तांची गर्दी अधिक होती. सुमारे दीड तास या लिलावाची प्रक्रिया सुरू होती. यात ग्रामीण भक्तांचाही मोठा सहभाग होता.नऊ दिवस मनोभावे आराधना करून सातारकरांनी दुर्गादेवी मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात केले. मात्र, विसर्जनावेळी मूर्ती टाकताना मोडण्याची भीती असते. तिचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी यंदा साताऱ्यात प्रथमच दौलतनगर, सूर्यवंशी कॉलनी येथील शिवशक्ती नवरात्र दुर्गोत्सव मंडळाने के्रनच्या साह्याने मूर्ती सुरक्षितपणे मंगळवार तळ्यात विसर्जित केली. शहरातील इतर मंडळांनीही असा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा मंडळाचे संस्थापक सतीश सूर्यवंशी व अध्यक्ष सचिन मर्ढेकर यांनी व्यक्त केली.
दुर्गाभक्तांनी आवरला डॉल्बीचा मोह
By admin | Published: October 05, 2014 12:17 AM