पाचवड : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये कातकरी समाजाला अनेक घटकांनी सामाजिक बांधिलकी जपत सढळ हाताने मदत केली. मात्र, यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये कातकरी समाज सेवाभावी संस्था व अन्य सामाजिक संस्थांच्या मदतीपासून दुर्लक्षित राहिल्याने या समाजावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
वाळलेल्या झाडाच्या फांद्या आणि तोडलेल्या उसाची पाचट याचं खोपटं बनवून त्यात आयुष्यभर वास्तव्य करणारी ही कातकरी कुटुंब. यांचा उदरनिर्वाह ओढे, नदी, धरणे अशा ठिकाणी मासेमारी करून पकडलेले मासे जवळील बाजारपेठेत विकून चालतो. आपल्या लहान मुलांना पाठीवर घेऊन मासेमारी करणारी ही कुटुंबे गेल्या एक महिन्यापासून घरी बसून आहेत. बाजारपेठा बंद असल्याने त्यांच्यासमोर कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजिक संस्थांबरोबरच वैयक्तिकरीत्या अनेकांनी या समाजाला वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा हात दिला होता. या लॉकडाऊनमध्ये मात्र अशाप्रकारे कोणतीच मदत या समाजापर्यंत पोहोचलेली नाही. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींबरोबरच प्रशासनानेही आशा दुर्लक्षित समाजाकडे अशा बिकट परिस्थिती लक्ष पुरवून त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये मासेमारी करून पैसे मिळवून त्या पैशाचा उपयोग पावसाळ्यामध्ये उदरनिर्वाहासाठी करणारा हा समाज लॉकडाऊनमुळे मात्र हतबल झाला आहे.
महत्त्वाची चौकट :
मदतीची गरज
पाचवड, खडकी, भुईंज याठिकाणी कातकरी समाजाची अनेक कुटुंबे आहेत. या कुटुंबांना खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या लॉकडाऊनमध्ये मदतीची गरज आहे.
===Photopath===
160521\20210516_191313.jpg
===Caption===
पाचवड-चिंधवली पुलावरील मदतीच्या प्रतीक्षेत असलेली कातकरी वस्ती