जे मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, त्यांचे विविध कार्यक्रम नियोजनानुसार ठरलेले असतात. मंत्रालयातून या दौऱ्यांची माहिती जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला देण्यात येते. या दौऱ्यामध्ये पोलीस प्रशासनावर विशेष जबाबदारी असते. मंत्र्यांच्या कॅनव्हायमध्ये पोलीस वाहनांसोबतच लक्ष वेधते ती शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका. पोलीस अधीक्षकांच्यावतीने मंत्र्यांच्या दौऱ्याबाबतच्या सूचना जिल्हा शासकीय रुग्णालयाला कळवली जाते. त्यानुसार ज्यादिवशी दौरा असतो, त्यादिवशी अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका सज्ज ठेवलेली असते. रक्ताचा तुटवडा राहू नये, याची विशेष काळजी घेतली जाते.
या रुग्णवाहिकेमध्ये प्रत्येकी एक मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, स्टाफ नर्स/ब्रदर्स, अटेंडन्स हे कर्मचारी तैनात असतात. त्यामध्ये प्राथमिक उपचारासाठी प्रथमोपचार पेटी असते. औषधे, क्रॅश ट्रॉली असते. ऑक्सिजनसोबत संबंधित मंत्री अथवा ज्या व्यक्तीसाठी राजशिष्टाचार असतो, त्या व्यक्तीच्या रक्तगटाचे रक्तदेखील व्हॅक्सीन कॅरिअरमध्ये असते. हा दौरा जोपर्यंत जिल्ह्यामध्ये आहे तोपर्यंत ही सर्व यंत्रणा दौऱ्यातील वाहनांच्या ताब्यात सज्ज ठेवलेली असते.
सध्याच्या घडीला तर विशेष सावधानता...
राज्याचे सहकारमंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे दोघे सातारा जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. तसेच त्यांचा दौरा हा नित्यनेमाने असतोच. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असल्याने त्यांचा दौरादेखील कायम असतो. राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे तर जिल्ह्यातील विविध संस्थांचे संचालकपद भूषवित आहेत. त्यांचा दौराही आठवड्यातून एकदा तरी असतो. त्यामुळे या दौऱ्यांवेळी अधिक सजगता प्रशासनाला बाळगावी लागते.
सागर गुजर