सातारा : नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा सराव करत असतानाच अचानक आई मध्ये आल्याने गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील पळसगाव येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगिता फडतरे (रा. पळसगाव, ता. खटाव) या गुरुवारी गोळी लागून जखमी झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह पळसगाव गाठले. पोलिसांनी त्यांचा मुलगा अभिषेक फडतरे याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने माळ्यावर साफसफाई करत असताना आईने बॅगेतून पिस्टल बाहेर काढले. तेव्हा चुकून गोळी सुटून आई जखमी झाली, अशी माहिती त्याने दिली.
पोलिसांनी त्याच्या आईकडे चौकशी केली. त्यावेळी तिनेही मुलगा सांगत असलेली कहाणी सांगितली. मात्र, पोलिसांना दोघांच्या बोलण्यातील तफावतीमुळे संशय अधिक बळावला. पोलिसांनी तपासाचा सर्व फोकस अभिषेक फडतरेकडे केला. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.अभिषेक हा उच्च शिक्षित असून पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी त्याने पुण्यातील मित्राच्या मदतीने धुळे शिरपूर येथून ५० हजार रुपयांना पिस्तूल विकत घेतले.अभिषेकच्या कुटुंबीयांचे पूर्वीपासून जवळच्या नातेवाईकासोबत जमिनीचे आणि घरगुती कारणातून वाद आहेत. त्यामुळे संबंधित नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी त्याने टोकाचे पाऊल उचलून पिस्तूल विकत घेतले होते. खुनाचा सराव तो घरातच करत होता. गुरूवारी सायंकाळी अशाच प्रकारे सराव करत असताना पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर अचानक आई मध्ये आली. त्याने झाडलेली गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेली. यामध्ये आई गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली.जखमी अवस्थेत आईला त्याने खासगी दवाखान्यात नेले. आई गंभीर जखमी असतानाही त्याने आईला पोलिसांना नेमके काय सांगायचे, याची जुजबी माहिती दिली. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने आणि हुशीरीपुढे अभिषेकचा थांग लागला नाही. अखेर त्याला आपल्या कृत्याची कबुली पोलिसांपुढे द्यावीच लागली.पोलिसांनी अभिषेकला अटक केल्याची माहिती पळसगाव परिसरात समजताच खळबळ उडाली. अभिषेकने ज्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यांनाही आपल्यावर जीवघेणा हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली. जमिनीच्या वादातून अभिषेकने नाते रक्तरंजीत करण्याचा डाव आखल्यामुळे जवळच्या नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज जाधव, दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड , पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, अर्जून शिरतोडे, अमित माने, स्वप्निल कुंभार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, वडूज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल सरतापे, अजय हंचाटे, सविता वाघमारे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.