कोपर्डे हवेली : आषाढ महिना म्हणजे मांसाहारी जेवणाचा बेत. वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावाखाली बकरी, कोंबड्यांचा बळी दिले जातात. सध्या ग्रामपंचायत निवडणुकाही आषाढ महिन्यात होत असल्याने आखाडीच्या नावाखाली जेवणावळी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची ‘हायटेक’ तयारी सुरू आहे.निवडणुका म्हटलं की, जेवणावळी आल्याच. कोणतीही निवडणूक असली तरी जेवणावळी झाल्या तरच उमेदवार व मतदारांना निवडणूक झाल्यासारखे वाटते. पूर्वीच्या तुलनेत निवडणुकीच्या प्रचारपद्धतीत सध्या मोठे बदल झाले आहेत. निवडून येण्यासाठी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, संपर्क तसेच साम, दाम, दंड यासारख्या गोष्टी उमेदवाराला अवगद असाव्या लागतात. तरच निवडणूक लढविणे सोपे जाते. गावपातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुका विकासापेक्षा भावकीच्या मतदानावर जास्त अवलंबून असतात. कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या भावकीचे मतदान आहे. यावर पॅनेलप्रमुख उमेदवाराची निश्चिती करतात. सध्या तालुक्यामध्ये ९३ ग्रामपंचायतींचे मतदान ४ आॅगस्ट रोजी होत असल्याने सर्वत्र निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रचारावर भर देण्यात येत आहे. मात्र, यावेळी उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. जेवणावळीसाठी हॉटेल, ढाबे तसेच ठिकठिकाणी शिवारात जेवणावळी सुरू करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून, मतदारांच्या समस्या ते नव्याने जाणून घेत आहेत. विकासाच्या प्रचारासाठी व स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. भविष्यातील वाद टाळण्यासाठी दोनपेक्षा अधिक पॅनेल असणाऱ्या काही गावांत उमेदवारांच्या प्रचारात बॅनरचा वापर टाळण्याच्या सूचना प्रचारप्रमुखांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. संवेदनशील गावांमध्ये शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने आठ दिवसांपासूनच उमेदवारांनी परगावी असणाऱ्या मतदारांच्याबरोबर देखील संपर्क ठेवला आहे. ‘ज्याचे सैन्य त्याची लढाई’ या उक्तीप्रमाणे जिंकण्यासाठी उमेदवार तरुणांना एकत्रित करून प्रचाराचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर)रडत राव घोड्यावर !ग्रामपंचायत उमेदवारांमध्ये आरक्षित जागेवरील उमेदवार देताना पॅनेलप्रमुखाची भांबेरी उडाली. शेवटी नको-नको म्हणत असताना ‘रडत राव घोड्यावर’ म्हणत काहीना उमेदवारी देण्यात आली. तेच तेच उमेदवार पुन्हा-पुन्हा निवडून येत असल्याने पाहिजे तसा विकास होत नाही. त्यामुळे विकासाची जाणीव असणाऱ्या नव्या उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे.- दीपक जाधव, मतदार, खराडे
आखाडीच्या नावाखाली मतदारांना जेवणावळी
By admin | Published: July 24, 2015 10:27 PM