सातारा : फसवणूक प्रकरणात पैशांच्या व्यवहारामध्ये तडजोड करण्यासाठी १ लाख ७५ हजारांच्या लाचेची मागणी करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील (वय ३८, मूळ रा. स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, राजेंद्रनगर कोल्हापूर) यांनी सापळा लावल्याचा संशय येताच तक्रारदाराकडून व्हाईस रेकॉर्डर घेऊन फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.डॉ. अभिजित पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे आणि सातारा लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी बुधवारी सापळा लावला होता. तक्रारदाराच्या शर्टला व्हाईस रेकॉर्डर लावून अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला डॉ. अभिजित पाटील यांच्याकडे पाठविले होते. यावेळी अभिजित पाटील यांनी तक्रारदाराला गाडीत बसविले. त्यावेळी त्यांना सापळा लावल्याचा संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून जबरदस्तीने व्हाईस रेकॉर्डर हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी काही अंतर गाडी सुसाट नेली. तसेच तक्रारदाराला मारहाण करून गाडीतून ढकलून दिले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने व्हाईस रेकॉर्डर वाटेत फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. दुसºया दिवशी पोलिसांनी व्हाईस रेकॉर्डरचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना अद्यापही रेकॉर्डर सापडला नाही. दरम्यान, या प्रकरानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाकडून पाच दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पाटील यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या घराची झडती घेतली असता पंधरा हजारांची रोकड आणि इतर साहित्य सापडले आहे.काय आहे प्रकरण...खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या वतीने तक्रारदार हे खासगी वकील म्हणून काम पाहत आहेत. या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्याकडे आहे. या गुन्ह्यातील आठ लाखांचा डीडी तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी अभिजित पाटील यांनी तक्रारदाराकडे अडीच लाखांची मागणी केली. त्यापैकी पाटील यांनी सुरुवातीला १ लाख ७५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार तक्रारदाराने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती.
डीवायएसपी पाटील यांनी संशय येताच फेकला व्हाईस रेकॉर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:42 PM