पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाटणसारख्या डोंगरी व दुर्गम विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मंजूर करून आणली आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण विकास, रस्ते विकास महामंडळ या विविध लेखाशिषार्तून ग्रामीण भागातील गावपोहोच रस्ते, वाडी वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गावे व वाड्या जोडणारे मोठे रस्ते तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अद्ययावत अभ्यासिका बांधणे या कामांचा समावेश आहे. ३२ कोटी ३७ लाख रुपयांची एकूण १५५ विकासकामे मंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर करून आणली आहेत. या कामांचे ऑनलाइन ई-भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईमधून होणार आहे. या विविध विकासकामांमुळे पाटणसारख्या ग्रामीण व डोंगरी भागातील अनेक गावे व डोंगर पठारावर वसलेल्या वाड्यावस्त्यांना चांगला लाभ होणार आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कामे मंजूर झाली असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
दीडशेवर विकासकामांचे उद्या ई-भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:12 AM