तांबवे : बॅटरी चार्ज केल्यानंतर युवकाने ई-बाईक सुरू केली. मात्र, बाईक सुरू करताच बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील साजूर येथे रविवारी दुपारी घडली. या दुर्घटनेतून युवक सुखरूप बचावला. मात्र, स्फोटानंतर लागलेल्या आगीत दुचाकीची सीट आणि इतर साहित्य जळून खाक झाले.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साजूर येथील गणेश बजरंग चव्हाण या युवकाची इलेक्ट्रिक दुचाकी आहे. रविवारी दुचाकीचे चार्जिंग संपले होते. त्यामुळे गणेश याने घरातच दुचाकी चार्जिंगला लावली. दुपारच्या सुमारास चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर गणेशने दुचाकी बाहेर काढली. त्यानंतर गावात जाण्यासाठी तो दुचाकीवर बसला. त्याने दुचाकीच्या स्टार्टरचे बटन दाबताच बॅटरीच्या डिकीतून धूर येऊ लागला. त्यामुळे गणेश दुचाकीवरुन उतरून बाजूला गेला. त्याचवेळी मोठा आवाज होऊन बॅटरीचा स्फोट झाला.या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. त्यांनी मिळेल त्या भांड्याने पाणी आणून दुचाकीला लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीच्या सीटखालून सुरू झालेली आग काही क्षणातच पसरली. या आगीत दुचाकीच्या सीटसह इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी गर्दी केली होती.दरम्यान, दुचाकी सुरू केल्यानंतर गणेश काही कामानिमित्त गावात जाणार होता. मात्र, दुचाकी सुरू करताच ही दुर्घटना घडली. तो दुचाकी सुरू करुन पुढे निघून गेला असता आणि त्यानंतर बॅटरीचा स्फोट झाला असता तर अनर्थ घडला असता. नशीब बलवत्तर म्हणूनच गणेश या दुर्घटनेतून सुखरूप बचावला.
Satara: ई बाईक सुरू करताच बॅटरीचा स्फोट, दुर्घटनेतून तरुण सुखरूप बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:20 PM