बामणोली : कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर यवतेश्वर ओलांडल्यावर लागणाऱ्या गणेश खिंड परिसरात सोनकीची फुले फुलण्यास प्रारंभ झाल्याने पठारावरील पुष्प हंगामाची नांदी झाली आहे. आठवडाभर पावसाने उघडीप दिल्यास फुलांचे गालिचे दिसू लागतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.सामान्यत: आॅगस्टच्या मध्यात किंवा अखेरीस सुरू होणारा कास पठारावरील फुलांचा हंगाम यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने लांबला आहे. निसर्गप्रेमींना हंगामाची प्रतीक्षा असून, पठार परिसरात पावसाने उघडीप दिल्याने निसर्गप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी जून महिना कोरडा जाऊन नंतर जुलैत मुसळधार पाऊस झाला. सह्याद्रीच्या सड्यांवर (काळ्या दगडाची पठारे) पाऊस थांबल्यानंतर दगडांमधील भेगांमधून माती वर येते आणि त्यावर चिमुकल्या वनस्पतींची सृष्टी बहरते. कास पठार हे त्यापैकी सर्वांत महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण पठार असून, येथे पुष्पवर्गीय वनस्पती सर्वाधिक असल्याने फुलांचे बहरणारे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. यावर्षी हंगाम लांबला असला, तरी येणारे पर्यटक कास परिसरातील पाऊस, धुके आणि भांबवलीच्या धबधब्याचा आनंद लुटत आहेत. तसेच बामणोलीपर्यंत जाऊन काठोकाठ भरलेल्या शिवसागर जलाशयात नौकाविहार करीत आहेत. यावर्षी हा जलाशयही कोरडा पडल्याने चिंता वाढली होती. परंतु कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, बामणोली, तापोळा येथेही पावसाळी पर्यटन बहरले आहे.कास पठारावर लवकरच तेरडा (इम्पेशन्स), सीतेची आसवे, गेंद, रानहळद अशी फुले फुलण्यास सुरुवात होईल. पावसाची उघडीप कायम राहिल्यास फुलांचे गालिचे लवकरच दिसू लागतील, असे जाणकारांनी सांगितले. प्रदेशनिष्ठ फुले सामान्यत: हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात बहरतात. प्रत्येक आठवड्यात फुलणारी वेगवेगळी फुले आणि त्यामुळे दर आठवड्यात पठाराचे बदलणारे रंग हे कास पठाराचे वैशिष्ट्य आहे. (वार्ताहर)गर्दीचे विभाजन व्हायला हवेवन विभाग आणि स्थानिक वनव्यवस्थापन समित्यांनी हंगामाचे नियोजन केले आहे. तथापि, शनिवार आणि रविवारीच पर्यटकांची गर्दी अधिक प्रमाणात दिसून येते, तर सोमवार ते शुक्रवार फारसे पर्यटक पठाराकडे फिरकत नाहीत. अजूनही कास पठाराची सहल ‘वीकेन्ड ट्रिप’ म्हणूनच साजरी केली जाते. तथापि, निसर्गाचे विविधरंगी आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांनी आठवडाभर हजेरी लावल्यास शनिवार-रविवारी येणारा अतिरिक्त ताण टळू शकतो. त्यामुळे शनिवार-रविवारी अधिक शुल्क आकारणे किंवा या दिवशी केवळ आगाऊ आरक्षण करूनच पर्यटकांना सोडणे असे पर्याय निसर्गप्रेमींनी सुचविले आहेत.
पश्चिम क्षितिजावर फुलांच्या हंगामाची नांदी
By admin | Published: September 07, 2014 10:29 PM