प्रवीण जाधवपाटण (जि.सातारा) : तुर्की येथे ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या ७.८ व ६.७ रिश्टर स्केलच्या महाप्रलंयकारी भूकंपाचे दोन धक्के बसले. या भूकंपाच्या नोंदी कोयनानगर येथील भूकंप वेधशाळेमध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे धक्के सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिट तसेच १० वाजून ३२ मिनिटांनी अनुक्रमे ७.८ व ६.७ रिश्टर स्केल नोंदविले गेले आहेत.कोयना धरणापासून तुर्की साडेचार हजार किलोमीटर एवढ्या लांब अंतर असून येथील भूकंपाच्या नोंदी कोयना भूकंपमापन केंद्रावर स्पष्ट आणि अचूक नोंदविल्या गेल्या आहेत. यामुळे कोयना धरणातील तांत्रिकता सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भूकंपमापन यंत्रांच्या कार्यपद्धतीची व कार्यक्षमतेची एक प्रकारे पुष्टी झालेली आहे.
भूकंपामुळे होणाऱ्या हादऱ्यांच्या नोंदीचा अभ्यास, विश्लेषण करणारे मुख्य कार्यालय नाशिक येथे आहे. कोयना येथील भूकंपमापन केंद्राने तुर्कीतील धक्क्यानंतर झालेल्या नोंदी नाशिकला पाठविल्या आहेत. त्यातील अभ्यासातून कोयना येथील भूकंपमापन केंद्रातील यंत्र आणि कर्मचारी सतर्क असल्याचे जाणवले. - नितेश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन