कोयनानगर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयना परिसरातील महाप्रलयकारी भूकंपास शनिवारी, दि ११ रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ डिसेंबर १९६७ च्या काळरात्रीने हजारो घरे जमीनदोस्त करीत संसार उद्ध्वस्त केले, तर शेकडो निष्पापांना जीव गमवावा लागला. आजही त्या प्रलयाच्या कटू आठवणीने सर्वांचा थरकाप उडतो. गत ५४ वर्षात या भूकंपाच्या भेगा बुजल्या असल्यातरी जखमा अजूनही भळभळत आहेत.
दरम्यान, शनिवारी कोयनानगर येथील तीन मंदिरात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूकंपात मृत पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.
कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना ११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. ६.५ ते ७ रिश्टर स्केल तीव्रता असलेल्या त्या भूकंपाने जमीन हादरली. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. कारण या भूकंपाच्या धक्क्याने १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला. सुमारे ४० हजारांवर घरे भूकंपात बाधित झाली. आणि ९३६ जनावरे मृत झाली. अनेक ठिकाणी जमिनींना मोठ्या भेगा पडल्या. भूस्खलन होऊन रस्ते खचले. १९६३ सालापासूनच कोयना भूकंपमापक केंद्रावर भूकंपाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत १ लाख २१ हजार २५७ धक्के या भागाने सोसले आहेत. १९६७ सालच्या त्या विनाशकारी भूकंपाच्या भेगा कालांतराने बुजल्या, मात्र भूकंपग्रस्तांच्या जखमा आजही ताज्या व भळभळणाऱ्या आहेत.
अनेक कुटुंबे वंचितभूकंपप्रवण क्षेत्राच्या शिक्क्यामुळे येथे नवीन उद्योग, प्रकल्प उभे राहत नाही, परिणामी येथील युवक पोटाची खळगी भरण्यासाठी शहराचा रस्ता धरत आहेत. १९९५ साली बंद पडलेले भूकंपाचे दाखले मंत्री शंभूराज देसाई यांनी २०१५ साली सुरू केले. त्याचा अनेक तरुणांना लाभ झाला, मात्र त्यातून मिळणारा लाभही दुसऱ्या-तिसऱ्या पिढीला असल्याने अनेक कुटुंबे वंचित राहिली आहेत.