सातारा : कोयना धरण परिसराला आज, मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता ३.३ इतकी नोंदली. तर गेल्या महिनाभरातील भूकंपाचा हा दुसरा धक्का होता. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरण परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात. तसेच काहीवेळा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, सातारा परिसरासह सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवतो. मंगळवारी सकाळीही ९ वाजून ४७ मिनीटांनी कोयना परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर ३.३ इतक्या तीव्रतेचा हा धक्का होता.
कोयनेपासून ९.६ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तर कोयना खोऱ्यातील काडोली गावच्या पश्चिमेला ७ किलोमीटरवर केंद्रबिंदुचे अंतर आहे. या केंद्रबिंदूची खोली ५ किलोमीटर होती. हा भूकंप कोयनानगर परिसरातच जाणवला. दरम्यान, ८ जानेवारीलाही कोयना परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला होता. कोयना धरणापासून ८ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तर या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ नोंद इतकी झाली होती.