मलटण : सातारा जिल्हा व फलटण तालुका आदर्श बहुजन शिक्षक संघाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील इब्टा संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व सभासदांची माळजाई मंदिर, फलटण येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणूक व संघटनेची भूमिका या संदर्भात सहविचार सभा झाली.
संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील जगदाळे, विष्णू नाळे, राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे, जिल्हाध्यक्ष गणपत बनसोडे, जिल्हा सरचिटणीस उत्तम चोरमले, जिल्हा कोषाध्यक्ष नितीन नाळे, जिल्हा कार्याध्यक्ष बिपीन जगताप, फलटण तालुका सरचिटणीस राजेंद्र अहिवळे, तालुका कोषाध्यक्ष विकास सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कर्णे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
बँकेच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध व अनावश्यक नोकर भरती विरोधात फक्त इब्टा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचप्रमाणे कर्ज मर्यादेचे उल्लंघन चेअरमन यांनी केले असून, यासंदर्भात सर्व प्रथम सहकार आयुक्त पुणे येथे केलेल्या इब्टा संघटनेच्या पाठपुराव्यामुळे बँकेची चौकशी लागल्याचे सांगितले, याचे सत्य लवकरच समोर येणार आहे, असे राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेश बोराटे यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र अहिवळे, अविनाश निकम, विजय जठार, श्रीनिवास धाईंजे गजानन नाळे, आकाश मोरे, रवींद्र मोहिते यांनी आपले विचार मांडले. आगामी शिक्षक बँकेची निवडणूक इब्टा संघटना स्वबळावर सातारा जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार, असा सर्वमुखी निर्णय घेण्यात आला. या सहविचार सभेला सुहास पिसे, विश्वास अर्जुन, देविदास नाळे, आबासो नाळे, संजय बडे, बांगर सर, अजित जगताप, सुरेश नाळे, नितीन फरांदे, आदी उपस्थित होते. राजेंद्र कर्णे यांनी आभार मानले.