सातारा : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांना अद्याप भत्ता मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दिवाळी संपण्याच्या आत हे दोन्ही भत्ते एकत्रित मिळावेत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये पार पडली. या कालावधीत पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात येतात. निवडणूक शांततेत पार पाडण्यात खरं तर पोलिसांचा मोठा वाटा असतो. मात्र याच पोलिसांना अनेक समस्यांना सामारे जावे लागते. खुद्द पोलिसांनाच शासनाच्या लाल फितीचा फटका बसत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काहीच करता येत नाही. तोंड दांबून मुक्क्याचा मार पोलीस सहन करीत आहेत. लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये सुमारे ४० ते ४५ आहोरात्र पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र या कर्तव्याचा मोबदला त्यांना त्याच वेळी मिळणे अपेक्षीत असते. परंतु दोन्ही निवडणुका पार पडल्या तरी काही कर्मचाऱ्यांना अद्याप भत्ते मिळाले नाहीत. मात्र काही अधिकारी आणि अधिकाऱ्यांना भत्ता मिळाला आहे. परंतु ज्यांना अद्याप हा भत्ता मिळाला नाही, त्यांना दिवाळी संपेपर्यंत तरी भत्ता मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विशेषत: वाई विभागात जे पोलीस कर्मचारी नियुक्त होते, त्यांचा यामध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुक होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत आल्याने भत्ता मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.गत निवडणुकीचा भत्ता अद्याप मिळाला नसताना आता विधानसभा निवडणुकीचा व लोकसभा निवडणुकीचा भत्ता दोन्ही सोबतच मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, निवडणूक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये बरीच तफावत आहे. मतदान अधिकाऱ्याला १७०० रुपये, मतदान कर्मचाऱ्याला १३०० रुपये, मतदान शिपायाला ९०० रुपये तर पोलीसदादाला अवघे ५०० रुपयांचा भत्ता मिळणार मिळतो. (प्रतिनिधी)
पोलीसदादांच्या भत्त्याला लागलेय लाल फितीचे ग्रहण
By admin | Published: October 23, 2014 9:02 PM