फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात धोम-बलकवडीचे पाणी आल्यामुळे शेतकरी समाधानी होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४ ते १५ लाख टोमॅटो रोपांची लागणही केली. गेल्या महिन्यापासून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी आली; परंतु, गेल्या आठवड्यात ‘लालकोळी’ नावाच्या रोगाचा बागांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे लाखो रुपये पाण्यात जाणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.फलटण तालुक्यातील काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक येथे टोमॅटोच्या चार-पाच हजार रोपांची लागण होत होती. मात्र, टोमॅटो उत्पादन व दर चांगला मिळू लागल्यामुळे शेतकरी इतर पिकांकडून टोमॅटो उत्पादनाकडे वळाला आहे. टोमॅटो पिकासाठी भांडवल एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये गुंतवावे लागते. यामध्ये टोमॅटोची रोपे, तारा, सुतळी, काट्या ही साधने व मजुरी यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. परिसरातील सालपे, आनंदगाव, हिंगणगाव, सासवड, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, कापशी, वाघोशी, कोल्हाळे. वडगाव परिसरात धोम-बलकवडीचे पाणी उजव्या कालव्याचे पाणी ओढ्याद्वारे सोडले. त्याचा परिणाम विहिरींवर होऊन पाणी पातळी वाढली आहे. त्याचा परिणाम विहिरींवर होऊन बागायती क्षेत्र वाढले. त्यामुळे पैसे देणारे पीक म्हणून आदर्की परिसरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४ ते १५ लाख रोपांची लागण होऊन त्यात शेतकऱ्यांनी चौदा ते पंधरा लाख रोपांची लागण करून एकप्रकारे जुगार खेळली आहे. परंतु, टोमॅटोचे दरच वाढलेले नाहीत. त्यातच गेल्या आठवड्यात सर्व बागांवर लालकोळी नावाच्या रोगाने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. आदर्कीच्या माळावर लाल चिखलटोमॅटो तोडणीस सुरुवात झाल्यानंतर पानांवर पिवळे टिपके पडतात. त्यानंतर दोन दिवसांत पूर्ण पाने करपून जातात. पुढच्या तीन-चार दिवसांत टोमॅटोची फळ अती पिकतात. बिलबिली झाल्यामुळे ती विक्रीस नेता येत नाही. कोणतेही औषध फवारणी केली तरी फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बाग घालविण्याशिवाय बळीराजाकडे पर्याय उरत नाही. परिसरातील शेतकरी खराब झालेले टोमॅटो बांधावर टाकून देत आहेत. हा रोग न पडला तर बाग आणखी तीन महिने उत्पादन मिळू शकले असते.
टोमॅटोवर लालकोळीचे ग्रहण
By admin | Published: August 03, 2015 9:43 PM