मंगलकार्य किंवा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते. आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना तो १० दिवस असावा, असे निश्चित केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी भावना आहे.
देवी-देवतांच्या मूर्तींचे जलात विसर्जन करण्याची प्राचीन परंपरा आहे. शास्त्रांमध्ये देवी-देवतांच्या मूर्तींचे पवित्र जलाशयात विसर्जन करावे, असे सांगितले जाते. यासाठी समुद्र, नदी, तलाव, कुंड यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. समुद्राला पाण्याचा राजा मानले जाते. यात अनेक नद्यांचे प्रवाह समाविष्ट झालेले असतात. म्हणूनच गणपती वा देवी-देवतांच्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करावे, असा सल्ला दिला जातो. यानंतर नद्यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. देशावर असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता, गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्य असल्यास घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन सर्वोत्तम ठरतेय.
चौकट :
शाडू किंवा मातीच्या मूर्तीचे विसर्जन घरातच बादलीत करण्यात येते. अवघ्या काही तासांत ही मूर्ती विरघळून जाते. त्याचे पाणी आणि अवशेष घरातील बागेसाठी उपयोगाला येतात. काहींनी तर घरात कायमस्वरूपी अशी धातूची मूर्ती ठेवली आहे. एकदाच चार-पाच हजार खर्च केले की, पुढे वर्षभर सुपारीचे विसर्जन आणि धातूच्या मूर्तीचे पूजन असे करण्याचा पायंडाही सातारकरांनी अवलंबला आहे.
कोट :
कला शाखेत शिकताना साधारण चार दशकांपूर्वी मी स्वत: तयार केलेल्या गणपतीची आम्ही अजूनही प्राणप्रतिष्ठापना करतो. वर्षभर मात्र ती सुरक्षित ठिकाणी ठेवतो. दर दोन-तीन वर्षांनी मूर्तीला रंग दिला की, त्यात नावीन्य येते. गणपती विकत आणणं ही पद्धतच आम्ही हद्दपार केलीय. विद्यार्थ्यांनाही मी हेच सांगतो.
- शेखर हसबनीस, कलाशिक्षक, सातारा
फोटो आहे