मलकापूर : पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी येथील मूर्ती कारागिरांनी मोठ्या प्रमाणात मातीच्या व शाडूच्या गणेश मूर्ती तयार केल्या. या मूर्तींची प्रतिष्ठापना होण्यासाठीही त्यांनी जनजागृती केली. कारागिरांच्या या उपक्रमाचे सध्या परिसरातून कौतुक होत आहे.गणेश चतुर्थीदिवशी रात्री उशिरापर्यंत कारागिर मूर्तीच्या विक्रीचे काम करत होते. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्रेत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. पावसाने ओढ दिल्याने काही प्रमाणात त्याचा गणेशोत्सवावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मूर्ती विक्रेत्यांमध्ये पारंपरिक कुंभार समाजाबरोबरच परप्रांतीय व इतर समाजातील अनेक व्यवसायिकांनी स्टॉल उभे केले होते. त्यापैकी मलकापुरात काही कारागिरांनी शंभरटक्के पर्यावरणपूरक शाडूच्या व मातीच्या गणेशमूर्ती विक्रीस ठेवल्या होत्या. अशी गणेशमूर्ती बनविण्यासाठी कारागिरांना एका मुर्तीला किमान दोन दिवस वेळ खर्ची करावा लागला. मात्र, कारागिरांनी वेळेचा विचार न करता पर्यावरण रक्षणाच्या हेतूने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार केल्या. मुर्ती खरेदीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कारागीर या मूर्ती विकत थांबले होते. पर्यावरण संवर्धनासाठी या मूर्ती उपयुक्त असून या मुर्तींची प्रतिष्ठापना होण्यासाठी अजुनही प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे कारागिर नितीन कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
इकोफ्रेंडली मूर्तीतून पर्यावरण रक्षण!
By admin | Published: September 21, 2015 8:59 PM