स्ट्रॉबेरी उत्पादकांना आर्थिक फटका
पाचगणी : गतवर्षीप्रमाणे यंदाही महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम ऐन भरात आला असतानाच संचारबंदी लागू झाल्याने महाबळेश्वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची पावले बंद झाली. स्ट्रॉबेरीची निर्यातदेखील यंदा थांबली आहे. बाजारपेठ बंद असल्याने स्ट्रॉबेरी शेतातच पडून असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची मागणी
सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या येवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणचे कठडे तुटले असून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील कठड्यांची डागडुजी करावी, धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे.
पालिकेजवळच व्हॉल्व्हला गळती
सातारा : सातारा नगरपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका व्हॉल्व्हला गेल्या अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. या व्हॉल्व्हमधून दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे; परंतु काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होत आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने परिसरातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
त्रिशंकू भागात स्वच्छतेची मागणी
सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या गोडोली, कोडोली या त्रिशंकू भागात पालिकेकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या भागात घंटागाडी सुरू असली तरी दोन ते तीन दिवसांतून एकदा घंटागाडी येत आहे. त्यामुळे रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग साचत आहेत. कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने हा कचरा इतरत्र पसरत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने या भागात कचरा संकलनासाठी दररोज घंटागाडी पाठवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.