मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील मायणी मेडिकल कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायणीत दाखल झाले. देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू होती. चौकशीदरम्यान कागदपत्रे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात दोन-तीन वर्षांपासून ईडीची चौकशी सुरू आहे. चौकशीअंतर्गत सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख व त्यांचे बंधू आप्पासाहेब देशमुख हे सुमारे दीड वर्षापासून अटकेत आहेत. तेव्हापासून या कुटुंबाची वारंवार चौकशी केली जात आहे. कागदपत्रे तपासणी, उलट तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी पथक पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी मायणीत दाखल झाले आहे.या चौकशीत कुटुंबातील सदस्य व कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सकाळपासूनच अधिक वेळ ईडीचे अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या शिंदेवाडी रस्त्यालगत असलेल्या घरामध्येच असल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
चौकशी लावण्यात आल्याची चर्चामायणीतील मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष हे माणचे आमदार जयकुमार गोरे आहेत. या कॉलेज अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची याचिका आमदार गोरे यांच्याविरोधात दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळेच ही चौकशी लावण्यात आल्याची चर्चा परिसरात सध्या सुरू आहे.