सातारा : मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचे दर वाढत गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलावरील आयात कर कमी केला. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलाचा पाऊचचा दर जवळपास १० रुपयांनी कमी झाला आहे.
खाद्यतेलात अनेक प्रकार आहेत. सोयाबीन तेल, पाम, सूर्यफूल, शेंगदाणा, मोहरी, राईस बान, तीळ आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यातही सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल अधिक करून वापरले जाते. मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचा पाऊच तसेच डब्याचा दर वाढलेला होता. यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चात वाढ झाली होती. पण, काही दिवसांपूर्वी तेलावरील आयात कर कमी झाल्याने पामतेल, सूर्यफूल आणि सोयाबीन खाद्यतेलात उतार आला आहे.
चौकट :
तेलाचे दर (प्रति लीटर)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १५५ ते १६० १४० ते १५०
सूर्यफूल १७५ १५५ ते १६५
शेंगदाणा १७० ते १८० १७० ते १८०
पामतेल १२५ १२०
मोहरी १८० १८० ते १९०
राईस बान १७० १६० ते १७०
तीळ १७० १७०
.............................................
म्हणून दर झाले कमी...
देशात तेलाचे उत्पादन कमी होते. भारतात जवळपास ७० टक्के खाद्यतेलाची आयात होते. हे तेल पाश्चात्य देशातून येते. काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने खाद्यतेलाच्या आयात करात ५ टक्के कपात केली आहे. यामुळे सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात उतार आल्याचे दिसून येत आहे.
- संभाजी आगुंडे, विक्रेता
.....................................
किराणा खर्चात बचत...
मागील आठ ते दहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. यामुळे घर खर्चातही काटकसर करण्याची वेळ आली होती. मात्र, सध्या तेलाचा दर डब्यामागे १०० ते १५० आणि लीटरच्या पाऊचमागे १० ते १५ रुपये कमी झाले आहेत. यामुळे किराणा खर्चातही बचत झाली आहे.
- साधना पाटील, गृहिणी
...................................................
शेंगदाणा तेलाचा दर टिकून...
केंद्र शासनाने खाद्यतेलावरील आयात कर कमी केला आहे. त्यामुळे काही तेलांचा दर उतरला. पण, शेंगदाणा तेलाचा टिकून आहे. याला कारण म्हणजे शेंगदाणा तेलाची निर्यात सुरू झाली आहे. मोहरी तेल दरातही काही रुपयांनी वाढ आहे.
.................................................